मार्वे रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य;वाहनचालक, नागरिक त्रस्त.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : मालाड पश्चिमेतील महत्त्वाच्या आणि व्हीआयपी समजल्या जाणाऱ्या मार्वे रोडची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

महानगरपालिकेच्या नोंदीनुसार मार्वे रोड हा मालाड पश्चिमेतील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर अनेक शासकीय कार्यालये आणि महत्त्वाच्या आस्थापना असल्याने वरिष्ठ अधिकारी आणि नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, या महत्त्वाच्या रस्त्याची झालेली दुरवस्था पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

मालवणी क्रमांक १ येथील स्थानिक आमदार अस्लम शेख आणि पी उत्तर विभाग प्रभाग समितीचे अध्यक्ष हैदर शेख यांच्या खासगी कार्यालयासमोर तसेच तलाठी कार्यालयासमोर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याशिवाय स्मशानभूमीसमोरील रस्ता, मिठ चौकी, खारोडी आणि राठोडी परिसरातही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. तसेच वाहनांच्या अपघाताची भीतीही व्यक्त केली जात असून खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

महत्त्वाच्या रस्त्यावरील या समस्येकडे पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. नागरिकांनी रस्ते विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्ता समतल करण्याची मागणी केली आहे.


Share

2 thoughts on “मार्वे रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य;वाहनचालक, नागरिक त्रस्त.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *