‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’…

Share

लोणी काळभोर ते यवत मार्गावर संविधान समता दिंडी

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई,ता.9; आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी शेकडो वर्षांची परंपरा जपत पायी वारी करतात. संत विचार आणि संविधानातील मूल्ये ही एकमेकांना पूरक असल्याचा संदेश देत समाजातील विविध घटकांना वारीचा अनुभव मिळावा, यासाठी भक्ती संगम समूह, महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने यंदाही ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे १३ वे वर्ष आहे.

१२ जुलैला  संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लोणी काळभोर ते यवत या मार्गावर ‘संविधान समता दिंडी’ काढण्यात येणार आहे. या दिंडीत महाराष्ट्राच्या विविध भागांतील तसेच विविध क्षेत्रांतील ५०० हून अधिक नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती संयोजक शरद कदम आणि विशाल विमल यांनी दिली.

“विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ” हा संत विचार मनात ठेवून हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. वारी हा केवळ धार्मिक सोहळा नसून महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा आहे. या वारशाचा प्रत्यक्ष अनुभव समाजातील विविध घटकांना मिळावा, यासाठी गेल्या १२ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वारीत सहभाग घेतला आहे. यामध्ये संत तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब महाराज देहूकर, हभप ज्ञानेश्वर महाराज वाबळे, हभप भारत महाराज जाधव, तुषार गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ, सुरेश खोपडे, अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्यासह अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.

यंदाही वारीत विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार असून, रविवार १२ जुलै रोजी लोणी काळभोर ते यवत या मार्गावर दुपारच्या विसाव्यापर्यंत सहभागी वारकरी चालणार आहेत.

या उपक्रमाच्या आयोजनासाठी कोकण विभागातून शरद कदम, नागेश जाधव, महादेव पाटील हे सहकार्य करत आहेत.


Share

One thought on “‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *