
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.
मुंबई : बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने बोरिवली येथील एच. एल. माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्कार समारंभात रयत शिक्षण संस्थेच्या सह्याद्रीनगर, कांदिवली येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शिल्पा जरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
२०२५–२६ मधील एस.एस.सी. परीक्षेत विद्यालयाने मिळविलेल्या उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय निकालाबद्दल सौ. शिल्पा जरे यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुख्याध्यापक संघटनेने त्यांच्या कार्याची दखल घेतली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुब्रह्मण्यम शर्मा उपस्थित होते. ते भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नातू (मुलीचे पुत्र) तसेच माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचे नातू असल्याचे आयोजकांनी सांगितले. हार्वर्ड विद्यापीठातील अनेक सुवर्णपदकांचे मानकरी तसेच तीन जागतिक कीर्तीच्या विद्यापीठांकडून डॉक्टरेट प्राप्त केलेले डॉ. शर्मा हे सुदीक्षा हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. त्यांच्या शुभहस्ते सौ. शिल्पा जरे यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बृहन्मुंबई परिसरातील विविध शाळांमधील गुणवंत मुख्याध्यापकांचाही गौरव करण्यात आला. डॉ. सुब्रह्मण्यम शर्मा यांनी शिक्षणातील गुणवत्ता, प्रभावी नेतृत्व, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित कार्यपद्धती याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांचे प्रेरणादायी विचार मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शक ठरले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षणप्रेमी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. शिल्पा जरे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा समिती सदस्य, पालक, माजी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Congrats Mam