
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : डोंगरी जेल रोड, उमर खाडी येथील पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौकी क्रमांक २ समोरील रस्त्यावर बुजविण्यात आलेला खड्डा पुन्हा उखडल्याने पालिकेच्या खड्डे बुजविण्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पालिका प्रशासनाकडून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी खड्डे योग्य पद्धतीने न बुजविल्याने काही तासांत किंवा दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा पूर्ववत होत असल्याचे चित्र आहे. त्याचेच उदाहरण उमर खाडी येथील जेल रोडवर पाहायला मिळत आहे.
या ठिकाणी पालिकेच्या वतीने कोल्ड मिक्सचा वापर करून खड्डा बुजविण्यात आला होता. मात्र, कोल्ड मिक्स खड्ड्यात व्यवस्थित दाबून रस्त्याच्या पातळीशी समतोल करण्यात आले नसल्याने ते पुन्हा निखळून रस्त्यावर पडले आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची चौकी क्रमांक २ आहे. पालिकेचेच कार्यालय असलेल्या ठिकाणच्या रस्त्यावरील खड्डा योग्य पद्धतीने बुजविला जात नसल्याने पालिकेचे अधिकारी आणि संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत की हा हलगर्जीपणा आहे? असा सवाल स्थानिक रहिवासी, पादचारी आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
खड्डे बुजविण्याच्या मोहिमेवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना कामाचा दर्जा आणि त्याची देखरेख याकडेही पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. संबंधित खड्डा तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने बुजवून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
कोट :या ठिकाणी ३ खड्डे रस्त्याच्या मधोमध पडले होते. ते खड्डे पालिकेने निट बुजवणे अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षत हा पालिकेचा हलग्रजी पणा कारण खड्डे बुजवून दिवस उलटत नाही तो पुन्हा खड्ड्यातून डांबर पूर्णपणे निखळून गेला त्यामुळे पालिकेच्या कामावर तसेच गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच या निकृष्ट दरज्या च्या कामावरून अधिकारी, कर्मचारी,कंत्राटदार यांच्या वर कारवाई होणार? का असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

खडडेमय मुंबईके रस्ते