रानवली ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ पटकावला पहिला क्रमांक!

Share

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा गौरव; हे यश संपूर्ण रानवली परिवाराचे – खा. सुनील तटकरे

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई : विकासकामांचा ध्यास, प्रशासकीय शिस्त आणि लोकसहभागाच्या ताकदीवर श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायतीने इतिहास घडवला आहे. राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत’ रानवली ग्रामपंचायतीने संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे लोकनेते तथा खासदार सुनील तटकरे यांनी ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

विशेष कार्यक्रमादरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी बोलताना त्यांनी रानवलीच्या या चमकदार कामगिरीचे मोकळ्या मनाने कौतुक केले.

“हा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमान केवळ एका व्यक्तीचा किंवा पदाचा नसून, रानवलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाचा, सर्व लोकप्रतिनिधींचा आणि दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा आहे. सर्वांच्या एकजुटीतूनच हे देदीप्यमान यश शक्य झाले आहे,” असे उद्गार खासदार तटकरे यांनी काढले.

खासदार तटकरे यांनी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, गावचे कर्तव्यदक्ष कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे मनापासून अभिनंदन केले.

पारदर्शक कारभार आणि विकासाचे नवे मॉडेल!

रानवली ग्रामपंचायतीने गेल्या काही काळात राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, डिजिटल आणि पारदर्शक कारभार, जलव्यवस्थापन, स्वच्छता, आणि लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळेच हा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. लोकप्रतिनिधींचा दूरदृष्टिकोन, कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग या ‘त्रिवेणी संगमा’मुळे रानवलीने जिल्ह्यासमोर विकासाचे एक आदर्श मॉडेल उभे केले आहे.

रानवली ग्रामपंचायतीच्या या अभूतपूर्व यशामुळे श्रीवर्धन तालुक्याची मान अभिमानाने उंचावली असून संपूर्ण रायगड जिल्ह्यातून रानवली ग्रामपंचायतीच्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे!


Share

One thought on “रानवली ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ पटकावला पहिला क्रमांक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *