
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालाड पी-पश्चिम विभागाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज, ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस स्थानिक आमदार अस्लम शेख, नगरसेवक गीता भंडारी, योगेश वर्मा, संगीता कोळी, विभागीय अधिकारी कुंदन वळवी तसेच पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत गणेशोत्सव काळातील वाहतूक व्यवस्था, मंडळांची सुरक्षा, विसर्जन व्यवस्था तसेच विविध प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली. भुजाले तलाव येथे सध्या डागडुजीचे काम सुरू असल्याने यंदा या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन करता येणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, ओम गजानन मित्र मंडळ, मालाड पश्चिमचे कार्यकर्ते स्वप्निल रमेश डुंबरे यांनी आमदार अस्लम शेख यांच्याकडे गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी दहीहंडीच्या धर्तीवर अपघाती विमा योजना सुरू करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र शासनाच्या दहीहंडी उत्सवासाठी असलेल्या अपघाती विमा योजनेप्रमाणेच गणेशोत्सवासाठीही विमा संरक्षण देण्यात यावे, अशी सूचना डुंबरे यांनी केली. गणेशोत्सवाच्या काळात मंडप उभारणी, विद्युत कामे, सजावट, मिरवणूक आणि विसर्जनादरम्यान मंडळांचे स्वयंसेवक, कार्यकर्ते, कर्मचारी, विद्युत कामगार, ढोल-ताशा पथकातील सदस्य तसेच नागरिकांना अपघाताचा धोका असतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने स्वतंत्र विमा योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली.
या योजनेत अपघाती मृत्यू तसेच कायमस्वरूपी अपंगत्वासाठी किमान १० लाख रुपयांचे विमा संरक्षण, जखमी कार्यकर्त्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र आर्थिक मदत आणि विम्याचा प्रीमियम शासन अथवा विशेष उत्सव निधीतून भरण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी डुंबरे यांनी केली.
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव असून लाखो स्वयंसेवक या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान देतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दहीहंडीप्रमाणेच गणेशोत्सवासाठीही अपघाती विमा संरक्षण योजना सुरू करणे आवश्यक असल्याचे स्वप्निल डुंबरे यांनी सांगितले. शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंती त्यांनी केली.