
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : महाराष्ट्रातील बालकांचे हक्क, बालसंरक्षण आणि बालकांच्या विविध प्रश्नांना राजकीय अजेंड्यावर आणण्याच्या उद्देशाने भाकर फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे नेते अमित राज ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी बालकांचे हक्क, बालसंरक्षण, बालकांसाठी असलेल्या संरक्षण यंत्रणा, बाल संरक्षण समित्या, शाळा व्यवस्थापन समित्या तसेच तळागाळात “बालसंरक्षक” निर्माण करण्याच्या गरजेबाबत निवेदन सादर करण्यात आले.
बालकांवरील अत्याचार किंवा शोषणाची घटना घडल्यानंतर केवळ प्रतिक्रिया देण्याऐवजी, अशा घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक बालसंरक्षणाची व्यवस्था गल्ली-वस्तीपासून निर्माण होणे आवश्यक आहे, यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.
यावेळी विधायक भारती संस्थेचे संस्थापक संतोष शिंदे यांनी लिहिलेली बाल संरक्षण समिती आणि बालहक्क विषयावरील पुस्तके अमित ठाकरे यांना भेट म्हणून देण्यात आली.
अमित ठाकरे यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बालकांच्या संरक्षणाच्या प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत बाल संरक्षण समित्या, शाळा व्यवस्थापन समित्या तसेच बालकांच्या संरक्षणाशी संबंधित विविध प्रश्न आणि यंत्रणांचा सखोल आढावा घेऊन पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
भाकर फाऊंडेशनचे संस्थापक ॲड. दिपक सोनावणे यांनी सांगितले की, “.बालसंरक्षण हा केवळ कार्यक्रम न राहता समाजाची सवय झाली पाहिजे. बालहक्कांचा प्रश्न गल्लीपासून राज्याच्या धोरणनिर्मितीपर्यंत राजकीय अजेंड्यावर येणे आवश्यक आहे.”
या वेळी भाकर फाऊंडेशनचे संस्थापक ॲड. दिपक सोनावणे, संचालक धनश्री नाईक आणि समन्वयक व शिक्षिका मंगला कुमठे उपस्थित होते.