‘कष्टकरी संघटने’ला बाबुराव सामंत संघर्ष पुरस्कार जाहीर

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव; २४ ऑक्टोबरला किरण माने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

मुंबई, ता. २२ : जल, जंगल आणि जमिनीवरील हक्कांसाठी तसेच आदिवासी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी गेली पाच दशके संघर्ष करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील कष्टकरी संघटनेला यंदाचा ‘बाबुराव (प. बा.) सामंत संघर्ष पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कलावंत, अभ्यासक आणि वक्ते किरण माने यांच्या हस्ते शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सार्वजनिक संसाधनांचा उपयोग समाजातील तळागाळातील लोकांच्या हितासाठी झाला पाहिजे, असा आग्रह धरणारे आणि या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेचा प्रभावी वापर करणारे साथी बाबुराव (प. बा.) सामंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. सामाजिक न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे, हा या पुरस्कारामागील उद्देश आहे.

आदिवासींच्या हक्कांसाठी पाच दशकांचा संघर्ष

पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागांत राहणाऱ्या आदिवासींचे प्रश्न, वेठबिगारी, शेतमजुरांचे शोषण, जमिनींचे वाद आणि विविध विकासप्रकल्पांमुळे होणारे विस्थापन अशा प्रश्नांवर कष्टकरी संघटनेने सातत्याने आवाज उठवला आहे. विखुरलेल्या कष्टकरी समाजाला संघटित करून त्यांच्यात हक्कांविषयी जागृती निर्माण करणे आणि अन्यायाविरोधात सामूहिक लढा उभारणे, हे संघटनेच्या कामाचे वैशिष्ट्य राहिले आहे.

दिवंगत प्रदीप प्रभू हे संघटनेचे संस्थापक होते. काळूराम धांगडा, जॉनभाऊ धांगडा, रामभाऊ घरत, निकी कार्डोझा, सुशीला डिसोझा आणि ब्रायन लोबो यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संघटना उभारण्यात आणि तिचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

जमीन हक्क, रोजगार आणि मजुरीसाठी लढा

आदिवासी आणि कष्टकऱ्यांच्या बळकावलेल्या किंवा हस्तांतरित झालेल्या जमिनी परत मिळवणे, बेदखलीपासून संरक्षण, कुळवहिवाटीच्या नोंदी, गावठाण आणि घरबांधणीसाठी जमिनी उपलब्ध करून देणे, अशा अनेक प्रश्नांवर संघटनेने संघर्ष केला आहे. पंचायत (अनुसूचित क्षेत्रांमध्ये विस्तार) कायदा अर्थात ‘पेसा’ (PESA) आणि वनहक्क कायदा (FRA) यांच्या अंमलबजावणीसाठीही संघटनेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

कंत्राटदारांकडून फसवणूक झालेल्या स्थलांतरित कामगारांना न्याय मिळवून देणे आणि त्यांची थकीत कोट्यवधी रुपयांची मजुरी वसूल करून देणे, हे संघटनेच्या कामातील महत्त्वाचे यश मानले जाते. जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड परिसरात रोजगार हमी योजना व कायद्यांतर्गत कामे आणि मजुरी मिळवून देण्यासाठी संघटनेने विशेष प्रयत्न केले आहेत.

आरोग्य, शिक्षण आणि महिला हक्कांवरही भर

संघटनेचे कार्य केवळ जमीन आणि रोजगाराच्या प्रश्नांपुरते मर्यादित राहिलेले नाही. समुदायाधारित सार्वजनिक आरोग्य सेवा, शालेय शिक्षणात सुधारणा, महिलांचे हक्क, कौटुंबिक हिंसाचाराविरोधातील लढा आणि महिलांना वारसा हक्क मिळवून देण्यासाठीही संघटना प्रयत्नशील आहे. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातही संघटनेने सातत्याने काम केले आहे.

पोलिसांची दडपशाही, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार, रेशन व गॅसपुरवठ्यातील अडचणी आणि दर्जेदार रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांसाठीही संघटनेने आवाज उठवला आहे. सामाजिक न्याय, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, कामगार हक्क आणि विविध वंचित समूहांच्या अधिकारांसाठी तिचा संघर्ष सुरू आहे.

कष्टकऱ्यांच्या श्रमाचे मोल, मानवी प्रतिष्ठा आणि मूलभूत हक्क जपण्यासाठी दीर्घकाळ कार्यरत राहिलेल्या कष्टकरी संघटनेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा

बाबुराव (प. बा.) सामंत संघर्ष पुरस्कार २०२६ चा वितरण सोहळा शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता केशव गोरे स्मारक ट्रस्टचे सभागृह, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात किरण माने यांच्या हस्ते कष्टकरी संघटनेला पुरस्कार प्रदान करून तिच्या दीर्घकालीन सामाजिक कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *