गोरेगावमध्ये जुना वृत्तपत्र विक्रीचा स्टॉल जमीनदोस्त

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

मुंबई : गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील  वृत्त पत्र विक्रेता मोहम्मद रफीक यांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला वृत्तपत्र विक्रीचा स्टॉल प्रशासनाने शुक्रवारी तोडल्याने स्थानिक दुकानदार आणि विक्रेत्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या कारवाईमुळे उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्याची भावना रफीक यांनी व्यक्त केली असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मोहम्मद रफीक हे अनेक वर्षांपासून या ठिकाणी वृत्तपत्रांची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, प्रशासनाने त्यांचा स्टॉल हटविल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही कारवाई एकतर्फी आणि अन्यायकारक असल्याचा आरोप रफीक यांनी केला आहे.

वृत्तपत्र विक्रीचे स्टॉल हे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे अशा स्टॉलवर कारवाई करताना शासनाच्या संबंधित मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. संबंधित मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

या घटनेमुळे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या रोजगाराचा आणि त्यांच्या व्यवसायाच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कारवाईचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी स्थानिक विक्रेत्यांकडून होत आहे.


Share

One thought on “गोरेगावमध्ये जुना वृत्तपत्र विक्रीचा स्टॉल जमीनदोस्त”

  1. वृत्तपत्र विक्रीचे स्टॉल हे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे महत्वाचे काम करत आहे आणि सरकारी कामाचा जनता आढावा घेत असते आणि वृत्तपत्र विक्रीचे स्टॉल हटवुन सरकार काय सिद्ध करणार आहे हे देवाला ठाउक आणि वृत्तपत्र विकणारयाच आता काय होणार याच उत्तर कोण देणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *