
एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे.
मुंबई : मालाड पश्चिम येथील नूतन कॉलेजसमोरील गिरीश केणी चाळीतील १७ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मुंबई भाजपचे सरचिटणीस विनोद शेलार यांच्या पाठपुराव्यामुळे या कुटुंबांना पर्यायी घरे मिळाली. घरांचे वाटप आणि चाव्या मिळाल्यानंतर रहिवाशांनी शेलार यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी भावना व्यक्त करताना अनेक रहिवाशांचे डोळे पाणावले.
गिरीश केणी चाळ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाच्या कक्षेत येत असल्याने येथील १७ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. पर्यायी घरे मिळत नसल्याने रहिवासी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चिंतेत होते. या प्रकरणी विनोद शेलार यांनी महापालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि संबंधित प्रशासकीय विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला.
या प्रयत्नांना अखेर यश आले. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांच्या उपस्थितीत १७ कुटुंबांना पर्यायी घरांची अलॉटमेंट पत्रे आणि चाव्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळाला.
‘कठीण काळात विनोद शेलार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हक्काच्या घरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आम्ही विसरणार नाही. आज घराच्या चाव्या हातात मिळाल्याने मोठा आनंद झाला आहे,’ अशा भावना रहिवाशांनी व्यक्त केल्या.
या वेळी कमिटी सदस्य प्रसाद माशेळकर, जयेश मेस्त्री, साई गडेकर, सत्यवान गुरव, नारायण गुरव, राजन मसके आणि कृष्णा बामगुडे यांच्यासह चाळीतील रहिवासी उपस्थित होते
खुप खुप छान घराचे स्वप्न बघता बघता लोकच जीवन सपुंन जात पण घराचे स्वप्न अधुर राहत ज्यानी पण हे काम केले मनापासुन शुभेच्छा