पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जाती-धर्मांच्या भाविकांना समानतेने दर्शनाचा अधिकार मिळावा.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

 मुंबई :पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जाती-धर्मांच्या भाविकांना समानतेने दर्शनाचा अधिकार मिळावा आणि अस्पृश्यतेच्या नावाखाली कोणालाही देवापासून दूर ठेवले जाऊ नये, यासाठी साने गुरुजींनी केलेले आमरण उपोषण भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व मानले जाते. त्या ऐतिहासिक संघर्षाची पार्श्वभूमी, समतेची तळमळ आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा उलगडून दाखविणारे राजा मंगळवेढेकर लिखित ‘पंढरीस वाजे घंटा’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते साथी वासू देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त इचलकरंजीचे संजय रेंदाळकर यांच्या पुढाकाराने सृजन प्रकाशनने या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन केले आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी मुंबईतील भटवाडी, घाटकोपर येथे श्रद्धा डान्स अकॅडमी आणि तरुण विकास सहकारी भांडार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमात संपन्न झाले. दैनिक प्रहारचे संपादक पद्मभूषण देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ सिनेअभिनेत्री सुहिता थत्ते यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी स्थानिक नगरसेविका सई शिर्के, काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष केतन शहा, सामाजिक कार्यकर्ते शरद कदम तसेच कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत कोपटे , नरेंद्र पेडणेकर, बिपिन शेट्ये यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी साने गुरुजींच्या समतेच्या विचारांचा वारसा जतन करणाऱ्या या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाचे स्वागत करत, आजच्या काळातही त्यातील विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली


Share

One thought on “पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जाती-धर्मांच्या भाविकांना समानतेने दर्शनाचा अधिकार मिळावा.”

  1. जाती धर्म सर्व विसरुन मणसाने माणसा सारखे वागले कि सर्व काही ठिक होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *