तुषार गांधी, फिरोज मिठीबोरवाला पोलिसांच्या ताब्यात; ऑगस्ट क्रांती मैदानावरील निदर्शने नियोजित वेळेत.

Share

एसएमएस -प्रतिनिधि -उत्कर्ष बोरले

मुंबई : महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांना शनिवारी सकाळी वांद्रे येथील नॅशनल कॉलेज परिसरातून, तर सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांना त्यांच्या राहत्या घरातून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे होणाऱ्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले.

तुषार गांधी हे ऑगस्ट क्रांती मैदानातील शहीद स्मृतिस्थळाजवळ जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे मुंबईतील नियोजित निदर्शनांबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. तथापि, तुषार गांधी यांनी कार्यक्रमात कोणताही बदल नसल्याचे स्पष्ट केले.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या, मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली आणि विद्यार्थ्यांना रेल्वेतून उतरवून ताब्यात घेण्यात आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी दुपारी ३.३० वाजता मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत.

लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी या निदर्शनांत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तुषार गांधी यांनी केले आहे. शांततापूर्ण मार्गाने लोकशाही हक्कांचे संरक्षण आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह कायम ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *