दिव्यांगांच्या विश्वासाशी खेळ थांबवा; आ.अस्लम शेख यांची मागणी

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई : निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विविध योजना जाहीर करायच्या आणि नंतर कोणतेही ठोस कारण न देता त्या बंद करायच्या, हा सरकारचा कारभार अत्यंत निषेधार्ह असल्याची टीका आमदार अस्लम शेख यांनी केली. विधानसभेत महाराष्ट्र विधानसभा नियम २९३ अंतर्गत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ‘धर्मवीर आनंद दिघे अर्थसहाय्य योजना’ तात्काळ पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.

आमदार शेख म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत ४० ते ८० टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना दर सहा महिन्यांनी ६ हजार रुपये, तर ८१ ते १०० टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना १८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले होते. मात्र, त्याच आर्थिक वर्षात केवळ एकच हप्ता वितरित करून ही योजना बंद करण्यात आली. त्यानंतर आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकाही दिव्यांग लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळाला नाही.

याहूनही गंभीर बाब म्हणजे आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो दिव्यांग बंधू-भगिनींच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले असून त्यांच्या विश्वासालाही तडा गेला आहे, असे त्यांनी नमूद केले.

शासनाकडून माहिती घेतल्यानंतर या योजनेला आवश्यक प्रशासकीय मंजुरीच नसल्याचे समोर आले आहे. मग प्रशासकीय मंजुरी नसताना योजना सुरू करण्याचा निर्णय कोणी घेतला? तसेच केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच ही घोषणा करण्यात आली होती का? असा थेट सवालही त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

दिव्यांग नागरिकांना दिलेले आश्वासन सरकारने पाळावे, ‘धर्मवीर आनंद दिघे अर्थसहाय्य योजना’ तात्काळ पूर्ववत सुरू करावी, नियमित निधीची तरतूद करावी आणि सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली.


Share

2 thoughts on “दिव्यांगांच्या विश्वासाशी खेळ थांबवा; आ.अस्लम शेख यांची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *