पुन्हा झाडे लावावीत – स्थानिकांची मागणी..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई : मेट्रो रेल्वे पुल उभारणीच्या कामादरम्यान दहिसर येथील आनंद नगर उड्डाणपुलाजवळ सफलता बिल्डिंग ते बाभळीपाडा परिसरातील सर्व्हिस रोड रुंदीकरणासाठी कापण्यात आलेली झाडे अद्याप पुन्हा लावण्यात आलेली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या परिसरात पुन्हा वृक्षारोपण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी राजेश पंडया यांनी केली आहे.

एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पासाठी मे २००० मध्ये महानगरपालिकेमार्फत सफलता, आविष्कार, शिवस्मृती आणि त्रिमूर्ती सोसायटीबाहेरील मुख्य रस्त्यालगतची सुमारे १५ ते २० वर्षे जुनी आठ मोठी हिरवीगार झाडे मुळासकट तोडण्यात आली होती. यामध्ये पिंपळ, वड, आंबा, गुलमोहर आणि अशोकाच्या झाडांचा समावेश होता.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या झाडांमुळे परिसरात सावली, थंडावा आणि स्वच्छ वातावरण निर्माण होत होते. तसेच चिमण्या, मैना आणि पोपट यांसारख्या पक्ष्यांचे वास्तव्यही या झाडांवर होते. झाडे तोडल्यानंतर पक्ष्यांचे अधिवास नष्ट झाले असून परिसरातील पर्यावरणीय समतोलही बिघडला आहे.

मेट्रो आणि रस्त्याचे काम पूर्ण होऊनही एमएमआरडीए किंवा महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून अद्याप या परिसरात नवीन झाडे लावण्यात आलेली नाहीत. सध्या अंदाजे ९० मीटर लांबीच्या रस्त्यावर एकही झाड नसल्याने नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. तसेच उड्डाणपुलावरील वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणातही वाढ झाली आहे.

महापौरांच्या वृक्षारोपण संदेशाचा विचार करून महानगरपालिकेने या परिसरात तातडीने वृक्षारोपण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


Share

One thought on “पुन्हा झाडे लावावीत – स्थानिकांची मागणी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *