
एसएमएस -प्रतिनिधी-सोमा डे.
मुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी साने गुरुजी वसाहत क्रमांक ३ आणि ४ येथील रस्त्यावर वीज बॉक्सच्या खालील भागात मे महिन्यात करण्यात आलेले खोदकाम तब्बल चार महिने उलटूनही अद्याप जैसे थेच पडून आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, संबंधित वीज कंपनी आणि पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी तसेच वीज बॉक्सच्या iखालील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी मे महिन्यात खोदकाम करण्यात आले होते. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेला भाग पूर्ववत करणे संबंधित यंत्रणेसाठी बंधनकारक असतानाही अद्याप या ठिकाणी रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नाही.
गेल्या चार महिन्यांपासून खड्डा तसाच पडून असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचण्याची शक्यता असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
या प्रकाराकडे पालिका प्रशासनानेही गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वीज कंपनी आणि पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
चार महिन्यांपासून एक साधा खड्डाही पूर्ववत केला जात नसल्याने ‘पालिका प्रशासन नेमके काम कसे करते?’ याचे उत्कृष्ट उदाहरणच या ठिकाणी पाहायला मिळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित यंत्रणेने तातडीने खोदकाम केलेला भाग पूर्ववत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.