एसएमएस -प्रतिनिधी -दिनेश गोसावी.
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या प्राथमिक (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक (इयत्ता सातवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील एकूण ३३ हजार २८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार विविध संवर्गनिहाय मंजूर संच निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार इयत्ता चौथीचे १६ हजार ६९३, तर इयत्ता सातवीचे १६ हजार ५८८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तसेच प्रमाणपत्रे संबंधित शाळांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अंतिम निकाल, गुणपत्रक, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवत्ता याद्या, जिल्हानिहाय शाळा सांख्यिकी माहिती आणि संवर्गनिहाय कटऑफ गुणांची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती भरल्यानंतरच उपलब्ध होणार आहे.
मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून परीक्षेस बसलेले विद्यार्थी, विहित वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी, शुल्क न भरलेले विद्यार्थी तसेच नियमानुसार पात्रता पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश करण्यात आलेला नाही. ऑनलाइन अर्जामध्ये चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पात्रता रद्द करण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
शिष्यवृत्तीच्या रकमेबाबतची पुढील कार्यवाही शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची शिफारस संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
निकालासाठी संकेतस्थळे :
mscepune.in
२०२६-२.puppssmsce.in