
एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या मालाड पश्चिम आणि कांदिवली पूर्व विधानसभा विभागाच्या वतीने बुधवारी (दि. २४) मालाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पाचे वेष धारण करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनादरम्यान रेल्वे प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन फलाट क्रमांक १ वरील प्रवाशांना उन्हाळा आणि पावसाळ्यात होणारा त्रास दूर करण्यासाठी तेथे शेड उभारण्याचे तसेच फलाटाचे रुंदीकरण करण्याचे आश्वासन दिले. ही कामे पुढील २० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा शब्द प्रशासनाकडून देण्यात आला.
या आंदोलनावेळी जितेंद्र पाटील, प्रसाद कुलापकर, विनायक राऊत, सुरेश चौरसिया यांच्यासह मालाड आणि कांदिवली विधानसभा क्षेत्रातील महिला व पुरुष पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मालाड पश्चिम विधानसभा विभागाध्यक्ष शशांक डेहलीकर आणि कांदिवली विधानसभा विभागाध्यक्ष महेश फरकासे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.