मालाड जल मय झाले……

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

मुंबई : मुंबईत गेल्या २४ तासांत झालेल्या जोरदार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, विशेषतः मालाड पूर्व परिसराला त्याचा मोठा फटका बसला आहे. उकाड्यापासून दिलासा देणाऱ्या या पावसाने शहरातील पावसाळी व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित केल्या आहेत.

मालाड रेल्वे स्थानक ते कुरार हायवे या महत्त्वाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली. अनेक ठिकाणी रस्त्यांचे स्वरूप अक्षरशः नदीसारखे झाले होते. परिणामी कार, बस, टॅक्सी, ट्रक, दुचाकी तसेच शालेय बससेवेवर मोठा परिणाम झाला. अनेक दुचाकी पाण्यात बंद पडल्या, तर प्रवाशांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.

रेल्वे स्थानक परिसरात सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

दरम्यान, मालाड पूर्वमधील कोकणीपाडा, तानाजी नगर आणि अप्पापाडा या भागांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर बनली. स्थानिक रहिवाशांच्या मते, परिसरात सुरू असलेल्या विविध एसआरए पुनर्विकास प्रकल्पांदरम्यान जुनी पावसाळी गटारे आणि जलनिस्सारण व्यवस्था हटविण्यात आल्याने पावसाचे पाणी बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

यामुळे पावसाचे पाणी शेजारच्या चाळी व घरांमध्ये शिरले. बांधकामातील मातीचा गाळ, सांडपाण्याच्या गटारातील घाण आणि कचरा घराघरांत पोहोचल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक कुटुंबांचे फर्निचर, घरगुती साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे खराब झाली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

स्थानिक रहिवाशांनी प्रशासन आणि संबंधित विकासकांवर निष्काळजीपणाचा आरोप करत, विकासकामांसोबत पर्यायी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. “विकासाच्या नावाखाली नागरिकांना दरवर्षी जलप्रलयाचा सामना करावा लागत असेल, तर अशा कामांचे नियोजन आणि देखरेख यावर गंभीर प्रश्न उपस्थित होतात,” अशी भावना अनेक रहिवाशांनी व्यक्त केली.

दरवर्षी कोट्यवधी रुपयांची प्री-मान्सून कामे करण्यात येत असतानाही पाणी तुंबण्याच्या समस्या कायम असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने सखल भागांतील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

मुंबईच्या वाढत्या शहरीकरणासोबतच प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था, विकासकामांचे योग्य नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.


Share

One thought on “मालाड जल मय झाले……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *