गायकाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; चालत्या रिक्षेतून ओढल्याने गंभीर दुखापत

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

मुंबई : कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या गायक वसीम अक्रम यांच्यावर गोरेगाव पूर्व परिसरात मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. या घटनेत अज्ञात व्यक्तींनी चालत्या रिक्षेतून त्यांना ओढल्याने ते खाली पडले आणि त्यांना दुखापत झाली.

वसीम अक्रम हे गोरेगाव पूर्व येथील डायमंड अपार्टमेंट, रॉयल पंप, आरे कॉलनी परिसरात राहतात. रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास बोरिवली येथील कार्यक्रम संपल्यानंतर ते रिक्षाने आपल्या घरी निघाले होते. रात्री साडेबारा ते पावणेएकच्या दरम्यान आरएस चेक नाक्याजवळ, सर्वोदय नगर परिसरातील रोड कटिंगच्या ठिकाणी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी चालत्या रिक्षेतून वसीम अक्रम यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मोबाईल खेचताना आरोपींनी त्यांना रिक्षेबाहेर ओढले. त्यानंतर मोबाईल हिसकावून दोन्ही आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेत वसीम अक्रम रस्त्यावर पडल्याने त्यांच्या शरीराला दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांनी रिक्षाचालकासोबत आरे कॉलनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेची तक्रार नोंदवली.

दरम्यान, वसीम अक्रम यांना उपचारासाठी अंधेरी येथील होली स्पिरिट रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *