
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचा पुढाकार; जलसंधारणाची कामे हाती घेण्याची सरपंचांची मागणी
संगमेश्वर : आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तळेकांटे आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून ‘मिशन बंधारे अभियान’ अंतर्गत कळंबटे वाडी येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे पाणी अडवून जलसंधारणाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. तळेकांटे गावातील हा पहिलाच वनराई बंधारा असून, सरपंच सुषमा बने यांनी यासाठी पुढाकार घेतला.
तळेकांटे गावातून बावनदी आणि सप्तलिंगी या दोन बारमाही नद्या वाहतात. मात्र, गावातून बारमाही नद्या वाहत असूनही वाड्या-वस्त्यांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. या दोन्ही नद्यांवर ‘मिशन बंधारे’ अभियान किंवा अन्य शासकीय योजनांच्या माध्यमातून बंधारे उभारून जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. तसेच, वाड्या-वस्त्यांमधील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशनची कामे प्राधान्याने सुरू करावीत, अशी मागणी सरपंच सुषमा बने यांनी केली.
कळंबटे वाडी येथे वनराई बंधारा उभारण्याच्या कामावेळी सरपंच सुषमा बने, ग्रामपंचायत सदस्य तुषार गुरव, पोलीस पाटील अनिल कळंबटे, अंगणवाडी सेविका श्रेया रेवाळे, ग्रामपंचायत कर्मचारी बाबू रेवाळे, अमृता रेवाळे, स्वाती शिंदे यांच्यासह संतोष कळंबटे, मनोज कळंबटे, अंकिता अनिल कळंबटे, आराध्या कळंबटे, देवश्री कळंबटे, जयश्री कळंबटे, सरिता कळंबटे आणि आदित्य जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.