
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.
दुष्काळ निवारणासाठी मुंबईकर सरसावले; प्रोफेशनल टॅक्सचा निधी जलसंधारणासाठी वापरण्याची मागणी करणार
५० हून अधिक कार्यकर्त्यांची बैठक; दुष्काळी परिषद आणि जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय
मुंबई : ग्रामीण भागातील दुष्काळाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मृणाल ताई गोरे दालन गोरेगाव,मुंबई येथे बुधवार दिनांक १८ रोजी, झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातून ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पाणी संवर्धन, उपलब्ध पाण्याचे पारदर्शक नियोजन आणि समन्यायी पाणीवाटप या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दुष्काळ निवारणासाठी शहरी आणि ग्रामीण नागरिकांना एकत्र आणून व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीत १९७२ मधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व्यवसाय कर अर्थात ‘प्रोफेशनल टॅक्स’ची संकल्पना पुढे आल्याचा मुद्दा मांडण्यात आला. सध्या ज्या पगारदार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून या कराची कपात होते, त्यांनी शासनाला पत्र पाठवून या करातून जमा होणारा निधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून माथा ते पायथा पद्धतीच्या पाणलोट क्षेत्र विकासासाठी वापरण्याची मागणी करावी, असे अभियान राबविण्याचे ठरले.
तसेच माथा ते पायथा पद्धतीने ‘माती आडवा, पाणी जिरवा’ हा जलसंधारण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तज्ज्ञांच्या सहभागातून मुंबईत चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागाशी नाळ जोडलेल्या मुंबईकरांना संघटित करून दुष्काळी परिषद घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.
शहरी नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी गोरेगावमधील शाळांमध्ये प्रत्यक्ष प्रबोधन कार्यक्रम, तसेच नागरिकांसाठी ऑनलाइन जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
दुष्काळावर तात्पुरते उपाय करण्याऐवजी जलसंधारण, पाण्याचे योग्य नियोजन आणि लोकसहभागातून शाश्वत उपाययोजना उभारण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली.