
एसएमएस -प्रतिनिधी -एन. एस. सय्यद
एमएमआरडीए, एसआरए, महापालिकेसह विविध विभागांच्या कारभाराविरोधात आंदोलन; नागरिकांचा मोठा पाठिंबा
मुंबई : मालाड पूर्वेतील आप्पापाडा परिसरातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोशी विधानसभा विभाग अध्यक्ष अॅड. भास्करभाऊ परब यांनी सोमवार (२ नोव्हेंबर) रोजी सकाळी १० वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आप्पापाडा येथील आनंदनगर रिक्षा स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ हे आंदोलन सुरू असून, परिसरातील नागरिकांचा त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे.
एमएमआरडीए, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), मुंबई महापालिका, वनविभाग आणि अग्निशमन दलाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करत अॅड. परब यांनी विविध मागण्या मांडल्या आहेत. प्रस्तावित रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन संबंधित पुनर्वसन विभागामार्फत करावे, तसेच परिसरातील नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
एमएमआरडीए आणि एसआरएच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या इमारतींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करत संबंधित कामांची आणि अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय परिसरातील प्रत्येक इमारतीपर्यंत पक्के रस्ते तयार करावेत, वनविभागाने आपल्या हद्दी निश्चित कराव्यात आणि वनक्षेत्रातील पात्र झोपडीधारकांचे नियमानुसार पुनर्वसन करावे, अशा मागण्यांचा आंदोलनात समावेश आहे.
नागरिकांचा आंदोलनाला पाठिंबा
आप्पापाडा परिसरातील नागरिकांनी अॅड. परब यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या नागरी समस्यांवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांची दखल घ्यावी आणि प्रश्न सोडविण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, असे आवाहन नागरिकांनी केले आहे.
प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे अॅड. परब यांच्या आमरण उपोषणाची प्रशासन कितपत दखल घेते आणि आप्पापाड्यातील नागरी समस्यांवर कोणता तोडगा काढते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
देव तारी त्याला कोण मारी
Good