
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले
मुंबई :फोर्ट येथील इंडो अमेरिकन सोसायटी च्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सभागृहात भाजी विक्रेत्या आणि फेरीवाल्या महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या एडव्होकेट सुशी शहा यांच्या हस्ते भायखळा तसेच अन्य भागातील महिलांना शाल, श्रीफळ आणि साडी देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात आशा, नूरजहाँ, मलिका, कलररासी, लक्ष्मी यादव, अंबु, वल्ली, गंगा, मालन, सेल्वी, पद्मा, हिरा, बॉबी, रक्षा, पुंजय, आरती, शबाना, सत्या, इंद्रा, अंबिका, शर्मिला, नगमा, गीता शिंदे, नीता शिंदे, रुपा वरुंडीया, राया सटल्या, शीला रॉय, गीता रॉय, अरुणा भुतिया, सोनी आदी जवळपास २५ महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना एडव्होकेट सुशी शहा यांनी सांगितले की, “या महिला ऊन, वारा, पाऊस आणि थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अथक परिश्रम घेतात. अनेकदा त्यांना नागरी अधिकारी व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडून विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा वंचित पार्श्वभूमीतील महिलांचा सन्मान करून त्यांना समाजात योग्य ओळख मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आज यशस्वी झाला, याचा आनंद आहे.”
तसेच या महिला अनेक कुटुंबांच्या एकमेव कमावत्या सदस्य असून त्यांच्या चिकाटी, जिद्द आणि समर्पणाची समाजाने दखल घेतली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सी. एस. परमेश्वर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करताना सांगितले की, “वर्धापन दिनासाठी समाजातील उच्चभ्रू व्यक्तींऐवजी सर्वसामान्य भाजी विक्रेत्या महिलांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तो प्रत्यक्षात आणल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”