महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायरची (यूके)नवीन कार्यकारिणी जाहीर

Share

एसएमएस -विशेष प्रतिनिधी

संस्कृती संवर्धन, मराठी शिक्षण, युवा विकास, क्रीडा आणि समाजसेवेसाठी कार्यकारिणी सज्ज

युके (केंब्रिजशायर): विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायरने (एमएमसी) (यूके) २०२७–२०३० या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी आणि प्रमुख कार्यकर्ता समिती जाहीर केली आहे. ब्रिटनमधील महाराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणणे, मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणे, तसेच शिक्षण, क्रीडा, आरोग्य आणि समाजसेवेच्या संधी वाढविणे या उद्देशाने मंडळ विविध उपक्रम राबविणार आहे.

सदस्यांनी नोंदविलेली स्वयंसेवेची आवड, वेळ देण्याची तयारी आणि आपली कौशल्ये व अनुभव समाजासाठी उपयोगात आणण्याची बांधिलकी यांच्या आधारे विविध जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. कार्यकारिणीसोबत क्लब प्रमुख, उपक्रम समन्वयक आणि सण-उत्सवांसाठी योगदान देणारा कार्यकर्त्यांचा संघ काम करणार आहे.

सात सदस्यीय कार्यकारिणी

मंडळाच्या अध्यक्ष व संचालकपदी राहुल इथापे, उपाध्यक्ष व संचालकपदी महेश पायगुडे, तर सचिवपदी विशाल पेंढारकर जबाबदारी सांभाळतील. निखिल पवार क्रीडा व युवा सचिव, सचिन पटेल खजिनदार व डेटा संरक्षण अधिकारी, केशव केळबाईकर जनसंपर्क व संवाद सचिव आणि अभिषेक बांदेकर सांस्कृतिक कार्यक्रम सचिव म्हणून काम पाहतील.

ही कार्यकारिणी मंडळाचे नियोजन, प्रशासन, आर्थिक व्यवस्थापन, सदस्यांशी संवाद आणि विविध उपक्रमांची अंमलबजावणी यांचा समन्वय साधेल. प्रमुख कार्यकर्त्यांच्या सहकार्याने नियमित उपक्रम आणि सामुदायिक कार्यक्रम पुढे नेण्यावर भर दिला जाणार आहे.

कला आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या

नृत्य व सांस्कृतिक सादरीकरण क्लबची जबाबदारी प्रणाली सावंत, तर गायन व संगीत क्लबची जबाबदारी अनंत अय्यर सांभाळतील. महाराष्ट्राच्या पारंपरिक कलांना व्यासपीठ देणाऱ्या ढोल-ताशा-लेझीम क्लबचे नेतृत्व तुषार शिंदे करतील.

या उपक्रमांमधून लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत विविध वयोगटांतील सदस्यांना कलागुण सादर करण्याची, एकत्र सराव करण्याची आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा मानस आहे.

क्रीडा आणि आरोग्यविषयक उपक्रम

बॅडमिंटन क्लबची जबाबदारी निखिल पवार, तर कॅरम व बुद्धिबळ क्लबची जबाबदारी केशव केळबाईकर यांच्याकडे देण्यात आली आहे. चालणे आणि योगविषयक उपक्रमांचा समन्वय भावना गायकवाड करतील. क्रीडा उपक्रमांसाठी लोकांचे नियोजन व समन्वय निखिल पवार आणि वरुण वाडेकर सांभाळतील.

नियमित सहभागातून शारीरिक सक्रियता, मैत्रीपूर्ण संवाद आणि सामाजिक सलोखा वाढविणे, तसेच युवकांना सामूहिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे यावर भर राहील.

मराठी भाषा, संस्कार आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन

संस्कार वर्गाचे नेतृत्व नचिकेत शेंबिकर, मराठी शाळेचे नेतृत्व केशव केळबाईकर, तर पुस्तक वाचनालय आणि वाचन मंडळाची जबाबदारी विशाल पेंढारकर सांभाळतील.

परदेशात वाढणाऱ्या मुलांना मराठी भाषा, साहित्य, सण-परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांची ओळख करून देणे हा या उपक्रमांचा महत्त्वाचा उद्देश आहे. वाचन, कथाकथन, चर्चा आणि सामूहिक सहभागातून विविध पिढ्यांमध्ये संवाद वाढविण्यासही मदत होणार आहे.

कार्यक्रम नियोजन, तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमे

कार्यक्रमांचे नियोजन, समन्वय आणि सूत्रसंचालनासाठी प्रतीक पागे, बसंत त्रिपाठी आणि अनंत अय्यर योगदान देतील. छायाचित्रण व चित्रीकरण क्लबची जबाबदारी आदित्य तारे, तर प्रणाली व तंत्रज्ञानविषयक कामांची जबाबदारी संदीप कदम सांभाळतील.

समाजमाध्यमांसाठी आशयनिर्मिती आणि प्रचार मोहिमांचे काम प्रणाली सावंत, नचिकेत शेंबिकर, निखिल पवार आणि केशव केळबाईकर संयुक्तपणे पाहतील. मंडळाच्या उपक्रमांची माहिती सदस्यांपर्यंत पोहोचविणे आणि अधिकाधिक कुटुंबांना सहभागासाठी प्रोत्साहित करणे यासाठी हा गट कार्यरत राहील.

सण-उत्सव आणि कार्यक्रमांसाठी नियोजन

मंडळाच्या सण-उत्सव व सामुदायिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी वर्षा सावरकर, संपदा इथापे, प्रियांका कदम, रुचा तुळसकर, रुपाली पाटील, भावना गायकवाड, समीर तुळसकर आणि सचिन पटेल हे प्रमुख स्वयंसेवक म्हणून योगदान देतील.

कार्यक्रमांच्या गरजेनुसार नियोजन, तयारी, प्रत्यक्ष आयोजन आणि इतर स्वयंसेवकांशी समन्वय साधण्यासाठी ही कार्यकारिणी व उपक्रम प्रमुखांना सहकार्य करेल.

सर्व पिढ्यांसाठी सहभागाचे व्यासपीठ

महाराष्ट्र मंडळ ,केंब्रिजशायरच्या (यूके)माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच मुलांचे शिक्षण, युवकांचा विकास, कुटुंबांचे आरोग्य व कल्याण, मनोरंजन आणि समाजसेवा यांना चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नव्याने परिसरात येणाऱ्या महाराष्ट्रीय कुटुंबांना समुदायाशी जोडण्यासाठीही मंडळाचे उपक्रम उपयुक्त व्यासपीठ ठरतील.

आपला वेळ, कौशल्य आणि अनुभव समाजासाठी देण्यास पुढे आलेल्या सर्व कार्यकारिणी सदस्यांचे, क्लब प्रमुखांचे आणि स्वयंसेवकांचे मंडळाने आभार मानले आहेत. सदस्य व कुटुंबांच्या सक्रिय सहभागातून अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि सेवाभावी समुदाय संस्था उभारण्याचा मंडळाचा संकल्प आहे.

‘आपलं मंडळ, आपली जबाबदारी, आपला सहभाग’ या भावनेतून सर्वांनी मंडळाच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष राहुल इथापे आणि सचिव विशाल पेंढारकर यांनी केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *