मुंबईत २१ ला ‘इन्व्हेस्टप्रो इंडिया २०२६’ आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषद

Share

एसएमएस -प्रतिनिधी -एस.एस. सय्यद.

ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि संजय भिडे यांचा औपचारिक पाठिंबा

मुंबई : आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील संधींवर चर्चा करण्यासाठी ‘इन्व्हेस्टप्रो इंडिया मुंबई २०२६’ या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेचे आयोजन २१ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील द सेंट रेजिस येथे करण्यात येणार आहे. बॉस्को कॉन्फरन्सतर्फे आयोजित या परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीला ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि संजय भिडे यांनी औपचारिक पाठिंबा जाहीर केला आहे.

या एकदिवसीय परिषदेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूक, व्यवसाय विस्तार, करप्रणाली, बँकिंग, मालमत्ता व्यवस्थापन, परदेशात व्यवसाय स्थापन करणे, नागरिकत्व गुंतवणूक कार्यक्रम आणि रिअल इस्टेट यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. याशिवाय, २०२७ मध्ये उच्च संपत्ती असलेल्या व्यक्तींनी (HNWIs) वास्तव्यासाठी कोणत्या देशांचा विचार करावा, या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.

परिषदेत १५ हून अधिक तज्ज्ञांची सादरीकरणे, १५ हून अधिक प्रदर्शकांचे प्रदर्शन तसेच प्रायोजक आणि भागीदारांशी थेट सल्लामसलत करण्याची संधी उपलब्ध असेल. भारतासह युरोप आणि मध्यपूर्वेतील तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. व्यवसाय मालक, उद्योजक, वकील, कर सल्लागार, कॉर्पोरेट सेवा पुरवठादार आणि संपत्ती व्यवस्थापक यांच्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि विविध देशांतील व्यावसायिक नियमांची माहिती मिळवणे, संभाव्य ग्राहक व व्यावसायिक भागीदारांशी संपर्क वाढवणे आणि जागतिक स्तरावर व्यवसाय विस्ताराच्या संधी शोधणे, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. परिषदेत इंग्रजी ही कामकाजाची भाषा असेल. सहभागींसाठी चहापान, दुपारचे भोजन आणि सायंकाळी कॉकटेल सत्राचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि गुंतवणुकीशी संबंधित क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *