मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’चा १ मे ला उद्घाटन.

Share

एसएमएस -प्रतिनिधी –दिनेश गोसावी

मुंबई : मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मे रोजी उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली.
शिंदे यांनी सांगितले की, प्रकल्पाचे सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित किरकोळ कामे लवकरच पूर्ण होतील. “कामाची गुणवत्ता समाधानकारक असून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
सुमारे १०.५ किमी लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅली परिसरात सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. कठीण भौगोलिक परिस्थिती, मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करणे मोठे आव्हान होते.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक कोंडी टाळून प्रवास २० ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे. अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटेल, असा दावा करण्यात आला आहे. यामुळे इंधन बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात घट अपेक्षित आहे.
या ‘मिसिंग लिंक’मुळे एक्सप्रेसवेचे अंतर सुमारे ६ किमीने कमी होणार असून सुरुवातीला बस आणि हलक्या वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
सुमारे ६७०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला २०१९ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे.
यामुळे लोहगड किल्ला , विसापूर किल्ला आणि कार्ला गुंफा यांसारख्या पर्यटनस्थळांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळेल.
राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी भविष्यात समृद्ध महामार्ग , कोकण कोस्टल रोड आणि वसई-विरार मल्टीमोडल कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना जोडण्याचा सरकारचा मानस असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असून राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


Share

One thought on “मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’चा १ मे ला उद्घाटन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *