एसएमएस -प्रतिनिधी -दिनेश गोसावी
ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांना आवाहन; पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक चार हजार रुपये
मुंबई : इतर मागासवर्गीय (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) तसेच विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) पात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.
केंद्र सरकारच्या ‘पीएम यशस्वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक चार हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
याशिवाय, महाडीबीटी २.० पोर्टलवर इयत्ता पाचवी ते आठवीतील ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या नववी व दहावीतील विद्यार्थिनींसाठीही स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.
मुंबईतील माध्यमिक शाळांमधील व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती, तसेच दारिद्र्यरेषेखालील पात्र विद्यार्थ्यांसाठी खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करणाऱ्या योजनांचाही लाभ घेता येणार आहे.
या योजनांची माहिती पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शाळांच्या मुख्याध्यापकांनी व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांनी पार पाडावी. विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे आवाहन विभागाने केले आहे.
ऑनलाइन अर्ज अनिवार्य
पीएम यशस्वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्जातील त्रुटी दूर करणे आणि संस्थास्तरावरील पडताळणीची प्रक्रिया १५ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही विभागाने दिले आहेत.