
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मालाड,ता. २६(प्रतिनिधी ) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायतीचे विभागस्तरीय मूल्यमापन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या ग्रामपंचायतीची तपासणी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उच्चस्तरीय समितीने केली.
मूल्यमापनादरम्यान समितीने अभियानातील आठ प्रमुख घटकांची सखोल पाहणी केली. ग्रामपंचायतीचे दप्तर, विकासकामे, स्वच्छता, प्रशासकीय कामकाज, विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी तसेच गावातील प्रत्यक्ष विकासकामांचा बारकाईने आढावा घेण्यात आला.
तपासणी समितीत अप्पर आयुक्त शालिनी कडू, सहाय्यक आयुक्त राजीव फडके, विस्तार अधिकारी किशोर पांडे आणि श्री. ताडे यांचा समावेश होता. समितीने ग्रामपंचायत कार्यालयासह विविध विकासकामांना भेट देऊन प्रत्यक्ष पडताळणी केली.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, श्रीवर्धनचे गटविकास अधिकारी राजू किरवे तसेच तालुक्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या मूल्यमापनावेळी सरपंच सुरेश मांडवकर, उपसरपंच आताउल्ला जळगावकर, ग्रामपंचायत अधिकारी अभिजीत माने, मुख्याध्यापक भिकू पांगरकर, ग्रामपंचायतीचे सदस्य, शाळा व आरोग्य कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवल्यानंतर आता विभागीय स्तरावरही रानवली ग्रामपंचायत उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. गावाने एकजुटीने राबविलेल्या विकासकामांचे तपासणी समितीनेही कौतुक केले.