एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, भारत जोडो अभियान, फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी, मूलभूत अधिकार संघर्ष समिती आणि लोकतांत्रिक राष्ट्रनिर्माण अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दिनांक २जुलै रोजी, दुपारी १.३० ते ३.०० वाजता टिळक भवन, दादर (प), मुंबई येथे लोकशाही वाचवा निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला मीनाक्षी नटराजन, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी प्रभारी, तेलंगाणा, प्रमुख उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील.
देशातील लोकशाही संस्था, संविधानिक मूल्ये आणि मुक्त व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर आघात होत असल्याची चिंता व्यक्त करत आयोजकांनी ही सभा बोलावली आहे. मीनाक्षी नटराजन यांच्या राज्यसभा उमेदवारी अर्जासंदर्भात घडलेल्या घटनांमुळे निवडणूक आयोगासह विविध घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेबाबत प्रश्न निर्माण झाल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
लोकशाही, संविधान आणि न्यायाच्या मूल्यांच्या रक्षणासाठी मीनाक्षी नटराजन यांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगत, हा लढा केवळ एका व्यक्तीचा किंवा एका पक्षाचा नसून लोकशाहीच्या आत्म्याचे संरक्षण करण्यासाठीचा संघर्ष असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या सभेत मीनाक्षी नटराजन त्यांच्या भूमिकेबाबत, अनुभवांबाबत, पुढील दिशेबाबत आणि भारतीय लोकशाहीविषयीच्या दृष्टीकोनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
छान उपक्रम