
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई :सद्या मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मालाड पूर्वेतील कुरार व्हिलेज परिसरातही पाहायला मिळत आहे. जिजामाता शाळेजवळील महानगरपालिकेच्या शारदाबाई गोविंद पवार गार्डनमध्ये सध्या निर्माण झालेला नैसर्गिक धबधबा नागरिकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.
गार्डनलगतच्या उंच भागातून मोठ्या वेगाने पाणी कोसळत असल्याने परिसरात धबधब्यासारखे मनमोहक दृश्य निर्माण झाले आहे. या दृश्यामुळे अनेक नागरिक आणि परिसरातील रहिवासी येथे गर्दी करून निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहेत.
दरम्यान, नेहमी क्रिकेट स्टेडियमप्रमाणे भव्य आणि आकर्षक दिसणारे हे मैदान सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेले असून त्याचे तलावात रूपांतर झाले आहे. मैदानात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने खेळाडू तसेच स्थानिक नागरिकांना मैदानाचा वापर करता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
एका बाजूला पावसामुळे तयार झालेला हा नैसर्गिक धबधबा नागरिकांचे लक्ष वेधून घेत असला, तरी दुसऱ्या बाजूला मैदानातील पाण्याचा निचरा आणि अपुऱ्या जलव्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेने या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करून पाणी साचण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी केली आहे.