सायन पुलाच्या चुकीच्या रचनेविरोधात मूक आंदोलन.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

सायन येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या पुलाच्या चुकीच्या रचनेमुळे अवर लेडी ऑफ गुड काउन्सेल हायस्कूल आणि चर्चच्या आवारात जाण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बॉम्बे कॅथलिक सभेच्या वतीने तसेच अवर लेडी ऑफ गुड काउन्सेल हायस्कूल आणि चर्च यांच्या सहकार्याने शनिवारी (ता. ३१) सायन पुलावर मूक आंदोलन करण्यात आले.

नव्या पुलाची उंची अधिक असल्याने शाळा व चर्चच्या आवारात वाहनांना प्रवेश करणे कठीण झाले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेच्या परिसरात रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच इतर आपत्कालीन वाहनांना प्रवेश मिळण्यात अडचणी येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. शाळेच्या आवारात वाहनांची ये-जा पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

स्कायवॉक हटविण्याची मागणी

सायन येथील स्कायवॉक पादचारी आणि विद्यार्थ्यांसाठी अडथळा ठरत असल्याचा आरोप करत तो हटविण्याची मागणीही आंदोलकांनी केली. या स्कायवॉकचा वापर समाजकंटकांकडून होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच शाळा आणि रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या पदपथावर काही फेरीवाले गॅस सिलिंडर व रॉकेलच्या शेगड्यांवर स्वयंपाक करतात. ही बाब बेकायदा आणि धोकादायक असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

या मूक आंदोलनात अवर लेडी ऑफ गुड काउन्सेल शाळेचे मुख्याध्यापक फादर साल्वाडोर डिसूझा, चर्चचे धर्मगुरू फादर टोनी डिसूझा यांच्यासह स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.अशी माहिती  डॉल्फी डिसूझा, प्रवक्ते, बॉम्बे कॅथलिक सभा यांनी दिली 


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *