सावरकर चौकात वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणी..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मालाड (पश्चिम) येथील बी. जे. पटेल रोडवरील लिबर्टी गार्डन परिसरातील वीर सावरकर चौकात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाल्याचा दावा करत मुंबई काँग्रेसचे महासचिव संतोष चिकणे यांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात चिकणे यांनी पी (पश्चिम) विभागाचे सहाय्यक आयुक्त, मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच गोरेगाव वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बी. जे. पटेल रोडवरील वीर सावरकर चौक हा अत्यंत वर्दळीचा असून येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. परिसरात निवासी इमारती,  शाळा तसेच पालिका कार्यालय तसेच अनेक बँक असल्यामुळे  पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र, वाढत्या बेशिस्त वाहतुकीमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती, आधुनिक वाहतूक सिग्नल कार्यान्वित करणे, झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था, आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर व वाहतूक सूचना फलक उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणे तसेच वाहतूक तज्ज्ञांकडून चौकाचे कायमस्वरूपी नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी संतोष चिकणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


Share

One thought on “सावरकर चौकात वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *