एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : युथ फॉर युनिटी अँड व्हॉलंटरी ॲक्शन (युवा – YUVA) संस्थेने शहरांतील अनौपचारिक वस्त्यांमध्ये हवामान बदलाशी जुळवून घेण्याच्या उपाययोजना अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने ‘सामुदायिक हवामान कृती नियोजन (CCAP) टूलकिट’ मराठी व इंग्रजी भाषेत लोकांच्या उपयोगासाठी प्रसिद्ध केले. ३० जुलै २०२६ रोजी मुंबईतील आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री येथे झालेल्या कार्यक्रमात या टूलकिटचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमात अनौपचारिक वस्त्यांतील नागरिक, शासकीय अधिकारी, लोकसंघटनांचे प्रतिनिधी, संशोधक, अभ्यासक आणि शहरी नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले. हवामान कृती नियोजन अधिक सर्वसमावेशक, स्थानिक गरजांशी सुसंगत आणि प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
भारतातील विविध शहरांतील अनौपचारिक वस्त्यांमध्ये अनेक वर्षे केलेल्या कामाच्या अनुभवातून विकसित करण्यात आलेले हे टूलकिट समुदाय, लोकसंघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना हवामानाशी संबंधित जोखमींची ओळख करून देत त्यावरील उपाययोजनांची आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शक ठरणार आहे.
युवा संस्थेच्या कार्यकारी संचालक रोशनी नुग्गेहल्ली यांनी सांगितले की, हवामान कृती नियोजन तेव्हाच प्रभावी ठरू शकते जेव्हा ते हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या अनौपचारिक वस्त्यांच्या वास्तवावर आधारित असेल. समुदायाच्या सहभागाशिवाय तयार होणाऱ्या ‘टॉप-डाउन’ धोरणांपेक्षा समुदाय-आधारित हवामान कृती नियोजन अधिक परिणामकारक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात आंबुजवाडी येथे राबविण्यात आलेल्या सीसीएपीच्या अनुभवासह वसई-विरार, नवी मुंबई आणि गुवाहाटी येथे सुरू असलेल्या उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. अनौपचारिक वस्त्यांमध्ये हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी तात्कालिक आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा समन्वय आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. सुरक्षित निवारा, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि हक्काची जमीन यांसारख्या मूलभूत सुविधा हवामान अनुकूलनाचा अविभाज्य भाग असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वाळवी यांनी समुदाय आणि प्रशासन यांच्यातील सातत्यपूर्ण सहकार्यामुळे पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पावसाच्या पाण्याचा निचरा, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित अनेक प्रश्न सोडविण्यात यश आल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी समुदायासोबत समन्वय साधून हवामान कृती अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी हवामान कृती नियोजनामध्ये अनौपचारिक वस्त्यांचा अधिक प्रभावी सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. संस्थात्मक पाठबळ आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या दोन्ही गोष्टी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचा समारोप मराठी आणि इंग्रजी भाषेतील ‘सामुदायिक हवामान कृती नियोजन (CCAP) टूलकिट’ च्या अधिकृत प्रकाशनाने झाला.
Good move