“हॉर्स रायडिंगच्या नावाखाली मैदानाचे व्यावसायिकीकरण?;”

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई : गोरेगाव (पश्चिम) येथील जवाहर नगर परिसरातील आय.बी. पटेल शाळेजवळ असलेल्या एकमेव सार्वजनिक खेळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हॉर्स रायडिंग कॅम्पमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जवाहर नगरमधील ३६८ प्लॉटच्या विस्तीर्ण वसाहतीसाठी हे एकमेव मैदान असून शाळांना सुट्ट्या लागलेल्या काळात मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागाच उपलब्ध राहत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सदर मैदानावर ९ हजार ते ११ हजार रुपये शुल्क आकारून हॉर्स रायडिंग कॅम्प आयोजित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हॉर्स रायडिंगला विरोध नसला तरी मैदानावर वारंवार विविध कार्यक्रम, मंडप उभारणी आणि बांबूंचे कुंपण केल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी आवश्यक असलेली मोकळी जागा कमी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गोरेगावातील काही खेळाची मैदाने यापूर्वीच खाजगी संस्थांच्या ताब्यात गेल्याचा आरोप करत, भविष्यात या मैदानावरही स्थानिक मुलांचा हक्क बाधित होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर तरुण पिढीला खेळासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी उपलब्ध मैदानांवर व्यावसायिक उपक्रम राबविले जात असल्याबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या खेळाच्या मैदानांवर कार्यक्रमांसाठी मंडप उभारण्यास परवानगी कशी दिली जाते, तसेच इमारत व कारखाने विभाग आणि उद्यान विभाग याकडे दुर्लक्ष का करत आहेत, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.


Share

One thought on ““हॉर्स रायडिंगच्या नावाखाली मैदानाचे व्यावसायिकीकरण?;”

  1. चुकीचा आहे मैदानाचे खेलनयसाठीच उपयोग झाल पाहिजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *