एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले.
मुंबई, दि. २६: शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. नरिमन पॉईंट येथील मुरली देवरा चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
नव्या वाहनांमध्ये ६५७ दुचाकी आणि ६३३ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. चारचाकी वाहनांमध्ये स्कॉर्पिओसह मोठी आर्मर्ड (अर्मेनिया) वाहने आहेत. या वाहनांमुळे गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे तसेच १०० आणि ११२ या हेल्पलाईन क्रमांकांवर आलेल्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणे अधिक सुलभ होणार आहे.
सध्या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींसाठी मुंबई पोलिसांचा सरासरी प्रतिसाद वेळ ५.३० मिनिटे आहे. नव्या वाहनांच्या समावेशामुळे हा वेळ आणखी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे गुन्ह्यांची जलद उकल करून पीडितांना तातडीने न्याय देणे शक्य होणार आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत एकूण ९० पोलीस ठाणे कार्यरत असून, प्रत्येक ठाण्याला पाच दुचाकी, चार स्कॉर्पिओ आणि एक मोठे वाहन अशा एकूण दहा वाहनांचे वाटप करण्यात येणार आहे. ही चारचाकी वाहने मोबाईल डेटा टर्मिनल, जीपीएस आणि व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा अशा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.
Great
Great
Nice