
एसएमएस -कृष्णा वाघमारे.
मुंबई : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांच्या दुरवस्थेने पुन्हा एकदा पालिका प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. मालाड पूर्वेतील जिजामाता शाळेजवळील कचरा पेटीजवळ मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याच परिसरातील जिजामाता शाळेच्या वळणावर आणखी एक लहान खड्डा निर्माण झाला आहे. हा खड्डा आकाराने लहान असला तरी दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत असून, त्यामध्ये वाहनाचे चाक अडकून अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी वर्दळ असलेल्या या परिसरात अद्याप संबंधित यंत्रणेकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठमोठे दावे केले जात असतानाच प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने या खड्ड्यांची दुरुस्ती करून परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे.