विद्यार्थी आंदोलनाच्या यशाचा जल्लोषात ठाकरे बंधू उपस्थित.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोरले.

मुंबई : छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील वीर सावरकर मार्गावर रविवारी ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत विजय सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या यशानिमित्त आयोजित या सभेला राज्याच्या विविध भागांतून विद्यार्थी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
सभेदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दोन्ही नेत्यांनी आपल्या थोडक्यातील भाषणातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एकजुटीने लढा देण्याची भूमिका मांडत, युवकांच्या भवितव्याशी तडजोड होणार नाही, असा संदेश दिला.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल उपस्थितांनी जल्लोष व्यक्त केला. सभास्थळी घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी तसेच राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सभेत सहभागी झाले होते.
सभेच्या अखेरीस विविध स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक प्रश्नांमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत विद्यार्थ्यांना आदरांजली वाहिली.
आयोजकांच्या माहितीनुसार, या सभेला लाखो विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थिती लावली. सभेनंतर परिसरात शांततेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *