एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधत महसूल प्रशासनातर्फे चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटर लॉ कॉलेज, ऑर्लेम, मालाड (पश्चिम) येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच ६७२ हून अधिक विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
मा. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर श्री. सौरभ कटियार (भा.प्र.से.) तथा मा. उपविभागीय अधिकारी (पश्चिम उपनगरे) श्री. प्रशांत ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बोरिवली तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती संघमित्रा बाविस्कर यांच्या पुढाकाराने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आमदार अस्लम शेख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाच्या विचारातून प्रेरणा घेऊन नागरिकांना शासकीय सेवा सुलभ, पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. महसूल समाधान शिबिरासारख्या उपक्रमांमुळे नागरिकांना विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी मिळत असल्याने त्यांचा वेळ व श्रम वाचतात. एखाद्या विद्यार्थ्यासाठी वेळेत मिळालेला दाखला त्याच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरतो, तर एखाद्या गरजू रुग्णासाठी तो जीवनदायी ठरू शकतो. अशा लोकाभिमुख उपक्रमांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा.”
या विशेष शिबिरात तहसीलदार कार्यालयामार्फत डोमिसाईल, उत्पन्न, ज्येष्ठ नागरिक, रहिवासी व जात प्रमाणपत्र, ७/१२, ८-अ आणि फेरफाराशी संबंधित सेवा, नगर भूमापन कार्यालयामार्फत मालमत्ता पत्रिका, फेरफार, दुरुस्ती, मोजणी अर्ज स्वीकारणे तसेच नकाशे उपलब्ध करून देण्याची सुविधा, संजय गांधी योजना कार्यालयामार्फत विविध सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती व लाभ, शिधावाटप कार्यालयामार्फत नवीन शिधापत्रिका, नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, पत्ता बदल व अन्न सुरक्षा योजनेसंदर्भातील सेवा, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, परिवहन विभागामार्फत वाहनचालक परवाना, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, पत्ता बदल व इतर सेवा, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विविध शैक्षणिक सेवांची माहिती व सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
या विशेष शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. नागरिकांना विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी, सुलभ व जलद पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
या कार्यक्रमास आमदार अस्लम शेख, प्रभाग समिती अध्यक्ष हैदर अली शेख, नगरसेविका योगिता कोळी, संगीता कोळी, कमरजहाँ सिद्दीकी, नगरसेवक विरेंद्र चौधरी, रफिक शेख तसेच महसूल विभाग व इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Gd