
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : “आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहा, प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेऊन त्याला कृतीची दिशा द्या,” असे आवाहन प्रमुख अतिथी डॉ. अजित जोशी, सीए यांनी केले. मालवणी येथे शनिवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी, आयोजित ‘युवा टॉक ’मध्ये ते बोलत होते.
जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, सफल विकास वेलफेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दल, मालवणी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ऑगस्ट रोजी ‘युवा टॉक ’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. अजित जोशी यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगताना ‘प्रश्न विचारण्याची सवय हीच पुढे जाण्याची ताकद आहे’ असे स्पष्ट केले. “जितके शक्य तितके, जसे शक्य तितके प्रश्न विचारत राहा,” असा संदेश त्यांनी तरुणांना दिला. शिक्षणासोबतच आरोग्यसेवा, औषधांची उपलब्धता, रस्ते, सुरक्षितता, निवारा आणि नागरिकांचे हक्क यांसारख्या दैनंदिन प्रश्नांकडेही तरुणांनी गांभीर्याने पाहावे, असे त्यांनी सांगितले.
“तुम्ही पूर्णपणे सक्षम आहात. तुमच्यात खूप क्षमता आहे,” असे सांगत त्यांनी तरुणांनी न घाबरता प्रश्न विचारत राहण्याचे आवाहन केले. भाषणाच्या शेवटी अल्लामा इक्बाल यांच्या प्रसिद्ध ओळींचा दाखला देत त्यांनी तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याचा संदेश दिला.
जेन झी चा परखड आवाज
‘युवा टॉक ’मध्ये सहभागी तरुण-तरुणींनी मोकळेपणाने आपले अनुभव, विचार आणि प्रश्न मांडले. इशा सय्यदने जेन झी चे प्रतिनिधित्व करत शिक्षण व्यवस्थेवर परखड भाष्य केले. सबा शेख आणि आयशा सय्यद यांनीही आत्मविश्वासाने आपले विचार मांडत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाला अतुल आपटे, सिरत सातपुते, कुमुद देसाई, मनिषा क्षीरसागर, शमा सय्यद, स्टॅनली फर्नांडिस, मसरत मोमिन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्थानिक डॉक्टर डॉ. अल्फिया मुल्ला यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने काम करण्याची गरज व्यक्त केली.
मालवणीतील राष्ट्रीय पातळीवरील थाय बॉक्सिंग चॅम्पियन जिक्राह शेख हिचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
जेन अल्फा चे सूत्रसंचालन ठरले आकर्षण
सफल लर्निंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी गाणी आणि नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. जेन अल्फा मधील इनाया मंसूरी आणि अंजलि डे यांनी आत्मविश्वासाने सूत्रसंचालन करत उपस्थितांची दाद मिळवली. लहान वयातील या मुलींचे प्रभावी सूत्रसंचालन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैशाली महाडिक, सोमा डे आणि मनोज परमार, उत्कर्ष बोरले यांनी विशेष मेहनत घेतली. तरुणाईला ऐकण्याची, तिच्यावर विश्वास ठेवण्याची आणि तिच्या आवाजाला व्यासपीठ देण्याची गरज या कार्यक्रमातून अधोरेखित झाली.