
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा संकलन व त्याची डम्पिंग ग्राउंडपर्यंत वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने जी-उत्तर विभागासाठी २० नवीन कचरा वाहतूक गाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या वाहनांचा शुभारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान येथे करण्यात आला.
पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्या पाठपुराव्यामुळे पालिकेच्या घनकचरा विभागाच्या ताफ्यात लहान-मोठ्या मिळून एकूण ७३ गाड्या कचरा संकलन व वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी २० नव्या गाड्यांचा लोकार्पण सोहळा राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी राज ठाकरे यांनी घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत छायाचित्रेही घेतली.
स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त मुंबईच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. नव्या वाहनांमुळे घनकचरा संकलनाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि प्रभावी होण्यास मदत होणार असून, जी-उत्तर विभागातील कचरा व्यवस्थापन व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन यशवंत किल्लेदार यांनी यावेळी केले.