केंब्रिजमध्ये घुमला ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायरच्या गणेशोत्सवाला विविध भारतीय समुदायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
केंब्रिज, युनायटेड किंगडम : सातासमुद्रापार ब्रिटनमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. ऐतिहासिक केंब्रिज शहरात महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायर (MMC) यांच्या वतीने आयोजित ‘Cambridgeshire Ganeshotsav 2026’ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने केंब्रिजचा परिसर दुमदुमून गेला.
पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेली आबालवृद्ध मंडळी यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे चित्र ब्रिटनमध्ये साकारले. गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना, पूजा व आरती करण्यात आली. केंब्रिजसह आसपासच्या परिसरातील अनेक कुटुंबांनी गणरायाचे दर्शन घेतले.
विविध भारतीय समुदायांचा सहभाग
यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा उत्सव केवळ मराठी समाजापुरता मर्यादित न राहता विविध भारतीय समुदायांना एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरला. विविध नृत्यशाळा, संगीत समूह, गायक व कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शास्त्रीय नृत्य, भारतीय संगीत तसेच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
लहान मुले आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष आकर्षण ठरला. ब्रिटनमध्ये वाढणाऱ्या नव्या पिढीला भारतीय व महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडण्यासाठी त्यांना विविध कार्यक्रमांत सक्रिय सहभागाची संधी देण्यात आली. पारंपरिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ, दागिने, एथनिक फॅशन आणि विविध व्यावसायिक स्टॉल्समुळे कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.
सामाजिक बांधिलकीचा संदेश
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि आरोग्यविषयक जनजागृतीचाही संदेश देण्यात आला. भारतीय समुदायामध्ये Dementia UK विषयी माहिती पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती करण्यात आली. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत समाजोपयोगी विषयांवर जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला.
दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाची उत्तरपूजा आणि गणपती विसर्जन मिरवणुकीने भक्तिमय सांगता झाली. त्यानंतर भाविक व सहभागी कुटुंबांनी एकत्रितपणे महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
‘पुढच्या पिढीपर्यंत मराठी संस्कृती पोहोचवणे हेच ध्येय’
महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायरचे अध्यक्ष राहुल इथापे म्हणाले, “केंब्रिज आणि आसपास राहणाऱ्या महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध समुदायांना एकत्र आणणे आणि मराठी भाषा, संस्कृती व परंपरांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा मंडळाचा प्रमुख उद्देश आहे. ‘Cambridgeshire Ganeshotsav’ हा केवळ धार्मिक उत्सव नसून संस्कृती, सामाजिक एकता आणि भारत-ब्रिटनमधील सांस्कृतिक नात्याचा उत्सव आहे.”
ब्रिटनमध्ये वाढणाऱ्या पुढच्या पिढीला गणेशोत्सवासारख्या सणांमागील संस्कृती व परंपरांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, तसेच विविध भारतीय समुदायांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी मंडळ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. उत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी कलाकार, स्वयंसेवक, प्रायोजक, सहभागी संस्था आणि कुटुंबांचे आभार मानले.
स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामागे महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायरच्या कोअर टीमसह अनेक स्वयंसेवकांचे योगदान राहिले. संदीप व प्रियांका कदम, केशव व अश्विनी केळबाईकर, विशाल पेंढारकर, रितेश व शिल्पा चांदावर, जितेंद्र व वृषाली भट्टड, निखिल व अमृता पवार, महेश व स्वप्नाली पैगुडे, संपदा इथापे, श्रेया इथापे, सहाना जोशी, अनुष्का, अर्णव कदम, वर्षा सावरकर, रुपाली पाटील, सी. डी. तिवारी आणि प्रीतम यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.
कार्यक्रमाचे नियोजन, गणपती आगमन, पूजा व्यवस्था, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजन, सूत्रसंचालन, नोंदणी व स्वागत, स्टॉल्सचे व्यवस्थापन, महाप्रसाद तसेच कार्यक्रमानंतरची आवराआवर अशा विविध स्तरांवर स्वयंसेवकांनी योगदान दिले.
सातासमुद्रापार मराठी संस्कृतीचा जागर
ब्रिटनमध्ये वाढणाऱ्या नव्या पिढीला मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरांशी जोडून ठेवण्यासाठी महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत आहे. अध्यक्ष राहुल इथापे यांच्या नेतृत्वाखाली केंब्रिज व आसपासच्या भागातील मराठी कुटुंबांना एकत्र आणण्याबरोबरच विविध भारतीय समुदायांमध्ये सांस्कृतिक संवाद आणि सामाजिक एकोपा वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर ब्रिटनमध्येही गणेशोत्सवाच्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचा जागर पाहायला मिळाला. अखेर ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात ‘कॅमब्रिज शायर गणेशोत्सव 2026’ची उत्साहपूर्ण सांगता झाली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *