मार्वे किनारी गणेशमूर्तींची भलीमोठी रांग; वाहतूक कोंडीने प्रशासनाची दमछाक…

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे

मार्वे समुद्रकिनारी गणेशमूर्तींच्या रांगा; वाहतूक कोंडीने प्रशासनाची दमछाक
विसर्जनासाठी पालिकेचे विशेष नियोजन; लोखंडी फ्लॅट, तराफे, क्रेन व मोठ्या बोटींची व्यवस्था

मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जनासाठी मार्वे समुद्रकिनारी आलेल्या गणेशमूर्तींच्या लांबच लांब रांगा लागल्याने मार्वे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. मार्वे टी-जंक्शन ते मालवणी चर्चपर्यंत रस्त्यावर सुमारे ५० हून अधिक मोठ्या सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाच्या प्रतीक्षेत होत्या. तर मार्वे समुद्रकिनारीही ५० हून अधिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभ्या होत्या. त्यामुळे अनेक गणेशमूर्तींचे विसर्जन संध्याकाळपर्यंत रखडले.

मार्वे समुद्रकिनारी गोरेगाव तसेच कांदिवली पूर्व-पश्चिम परिसरातून शेकडो गणेशमूर्ती विसर्जनासाठी येतात. उशिराने निघालेल्या गणेशमूर्ती, संथ वाहतूक आणि रस्त्यावरील गर्दीमुळे मंडळांना मार्वे समुद्रकिनारी पोहोचण्यास विलंब झाला. मार्वे टी-जंक्शन ते समुद्रकिनाऱ्यादरम्यानचा रस्ता गणेशमूर्तींनी भरून गेला होता. त्यात डम्पर, व्हॅनिटी व्हॅन तसेच बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस आणि वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक झाली. मालाड ते मढ जेट्टीदरम्यान धावणाऱ्या बेस्ट बस क्रमांक २७२ व २७१, तसेच बोरिवली ते मढ जेट्टी जाणारी २६९ क्रमांकाची बस मालवणी चर्च येथून वळवण्यात आली.

विसर्जनासाठी विशेष नियोजन
मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीत आणि सुरक्षितपणे करता यावे, यासाठी पालिकेच्या पी-उत्तर विभागाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. समुद्रकिनारी लोखंडी फ्लॅट टाकण्यात आले होते. तसेच विसर्जनासाठी तराफे, क्रेन आणि मोठ्या बोटींची व्यवस्था करण्यात आली होती.

पोलीस प्रशासनाच्या नियंत्रण कक्षातून लाऊडस्पीकरद्वारे सतत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात होते. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राणी पुरी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रणात सहभाग घेतला.

दरम्यान, मालवणी क्रमांक १ ते अग्निशमन दल आणि शहीद अब्दुल हमीद रस्ता गुलालाने गुलाबी झाला होता. विसर्जनानंतर परिसरातील स्वच्छतेसाठी सामाजिक संस्था, विविध संघटना तसेच शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थीही सरसावले होते. महिला, पुरुष आणि चिमुकल्यांसह मोठ्या संख्येने भाविक विसर्जनासाठी उपस्थित होते.

भविष्यात अधिक नियोजनाची गरज
मार्वे टी-जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने पुढील वर्षी अधिक प्रभावी नियोजन करण्याची गरज आहे. मोठ्या सार्वजनिक गणेशमूर्तींच्या मिरवणुका लालबागच्या धर्तीवर काही तास आधी मार्गस्थ केल्यास एकाच वेळी होणारी गर्दी कमी होऊ शकते. त्यामुळे वाहतूक कोंडी तसेच पोलिस व प्रशासनावरील अतिरिक्त ताण कमी होऊन गणेश विसर्जन वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *