एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : जात, धर्म आणि लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन समता, बंधुभाव आणि विवेकाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (मुंबई जिल्हा) आणि मुंबई फॉर पीस यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी ‘समतेचा गरबा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. प्रभादेवी येथील टिळक भवन येथे सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
‘सर्वांसाठी गरबा : माणसांचा, माणसांसाठी’ ही या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जात, धर्म किंवा लिंग यांचा कोणताही भेद न करता प्रत्येकाला गरब्यात सहभागी होण्याची संधी देणे, हा या आयोजनामागील उद्देश आहे.
नृत्याच्या माध्यमातून सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन, निर्भयता आणि नैतिक मूल्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. उत्सवाच्या माध्यमातून माणुसकी, समावेशकता आणि विवेकवादी विचारांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम ठरणार आहे.
‘चला नाचूया!’ या आवाहनासह आयोजित करण्यात आलेल्या समतेच्या गरब्यात सहभागी होऊन समतेचा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.तसेच अधिकाधिक लोकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन ही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Great initiative