४०० एमएलडी प्रकल्पाला विरोध; मच्छिमार, शेतकरी आणि भूमिपुत्रांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : मनोरी येथे प्रस्तावित ४०० एमएलडी क्षमतेच्या समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या निःक्षारीकरण प्रकल्पाविरोधात मच्छिमार, शेतकरी आणि भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पाच्या विरोधात सोमवारी, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो आणि अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मनोरी, गोराई, मालवणी, भाटी, मढ आणि उत्तन परिसरातील मच्छिमार, शेतकरी व स्थानिक भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
समुद्री जैवविविधता आणि रोजगार धोक्यात येण्याची भीती
प्रस्तावित प्रकल्पामुळे समुद्रात दररोज सुमारे ६०० एमएलडी म्हणजेच ६० कोटी लिटर अतिक्षारयुक्त पाणी (ब्राइन) सोडले जाण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे समुद्रातील क्षारतेचे प्रमाण आणि तापमान वाढून मासे प्रजनन व मत्स्यसंवर्धनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच खेकडे, शिंपले आणि कालव यांसारख्या सागरी जीवांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होण्याची भीती मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.
या संभाव्य परिणामांमुळे पारंपरिक मासेमारी व्यवसायावर संकट येऊन हजारो मच्छिमारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. अर्नाळा-वसईपासून गोराई, मनोरी, मालवणी, भाटी, मढ, वर्सोवा ते कफ परेडपर्यंतच्या मच्छिमार समुदायावर या प्रकल्पाचे परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे.
समुद्र, जमीन आणि रोजगार वाचवण्यासाठी एकजुटीचे आवाहन
सरकारकडून मनोरीतील बन डोंगर परिसरात हा प्रकल्प राबविण्याच्या प्रस्तावाला स्थानिकांचा विरोध आहे. या प्रकल्पामुळे गावांचे पर्यावरण, स्थानिक संस्कृती, पारंपरिक मासेमारी व्यवसाय आणि शेतीवर परिणाम होण्याची चिंता आंदोलकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी आणि पारंपरिक उपजीविकेच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनाला नॅशनल फिशवर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्था, मढ ते गोराई मच्छिमार संघर्ष समिती, सर्व कोळी जमात पाटील व पंच मंडळे, मनोरी फिशरमन सहकारी संस्था, मनोरी सागरदीप मच्छिमार सहकारी संस्था, मनोरी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्था, दर्यावर्दी महिला संघ (माहिम), गोराई व्हिलेजर्स वेल्फेअर असोसिएशन आणि गोराई शेतकरी विकास संस्था आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
“आमच्या समुद्रावर, आमच्या जमिनीवर आणि आमच्या रोजगारावर घाला घालणारा प्रकल्प आम्हाला मान्य नाही,” अशी भूमिका घेत मच्छिमार, शेतकरी आणि भूमिपुत्रांनी एकजुटीने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.