मालाडमध्ये ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेची राज्यस्तरीय उपांत्य फेरी..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.

‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेची राज्यस्तरीय उपांत्य फेरी..

‘समर्थ भारत अभियान’अंतर्गत मनोनिग्रह फाउंडेशनचा संस्कारक्षम उपक्रम; मान्यवरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मुंबई : मनाचे श्लोक हे केवळ श्लोक नसून सद्विचारांची आणि सदाचाराची दिशा देणारे अमूल्य मार्गदर्शन आहे. या विचारांचा प्रसार करून तरुण पिढीवर उत्तम संस्कार घडविण्याच्या उद्देशाने ‘समर्थ भारत अभियान’अंतर्गत मनोनिग्रह फाउंडेशनच्या वतीने ‘मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धे’ची राज्यस्तरीय उपांत्य फेरी आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. मालाड पूर्व येथील उत्कर्ष मंदिरात हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि सद्विचारांची रुजवण व्हावी, तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक, नागरिक आणि समर्थ भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुण दामले होते. प्रमुख अतिथी म्हणून योगेश बुवा रामदासी, तर विशेष अतिथी म्हणून श्रीकांत मराठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. राजीव नगरकर होते. समर्थ भक्त दीप्ती ताई बेडेकर यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळली. यावेळी कॅपजेमिनी या बहुराष्ट्रीय कंपनीच्या युरोप विभागाचे व्यवस्थापकीय संचालक गौरव बेडेकर यांचीही विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना आशीर्वाद दिले. मनाचे श्लोक पाठांतराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दाखवलेली स्मरणशक्ती, एकाग्रता आणि सादरीकरण कौशल्य यांचे कौतुक करण्यात आले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची जपणूक होण्यास मदत होते, हा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ भक्त क्षितिजा लोखंडे यांनी ओघवत्या भाषेत आणि चतुरस्र शैलीत केले. त्यांच्या प्रभावी निवेदनाने उपस्थितांची मने जिंकली.

संस्कारांची शिदोरी देणारा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या पाठांतर कौशल्याचे कौतुक आणि गुणवंतांचा सन्मान यांमुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *