मुख्याध्यापिका वर्षा शोभणे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

आदर्श विद्यालयातील ३३ वर्षांच्या शैक्षणिक व कलाक्षेत्रातील योगदानाचा गौरव

मुंबई : गोरेगाव येथील आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा मिलिंद शोभणे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कलाशिक्षिका, पर्यवेक्षिका आणि मुख्याध्यापिका अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी शाळेच्या शैक्षणिक व कलात्मक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

शोभणे यांनी १३ जून १९९३ पासून आदर्श विद्यालयात कलाशिक्षिका म्हणून कामाला सुरुवात केली. तब्बल २५ वर्षे कलाशिक्षिका, चार वर्षे पर्यवेक्षिका आणि साडेतीन वर्षे मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. त्यांच्या कलात्मक दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या वैयक्तिक मार्गदर्शनातून शाळेचा कला विभाग समृद्ध झाला. विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना योग्य दिशा देत त्यांनी अनेक कलाकार घडवले.

त्यांच्या मुख्याध्यापकपदाच्या कार्यकाळात आदर्श विद्यालयाला उत्कृष्ट शाळा पुरस्कार प्राप्त झाला. तसेच, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाची दखल घेत विविध संस्थांकडून त्यांना ‘कलारत्न’ आणि ‘आदर्श कला शिक्षक’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

त्यांच्या दीर्घकालीन सेवाकार्याबद्दल आयोजित या सोहळ्याला शाळेचे संस्थाचालक विजय सहारे, पर्यवेक्षिका प्रभावती गडांकुश, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शोभणे यांचे कुटुंबीय आणि माजी मुख्याध्यापिका उपस्थित होत्या. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सहभोजनानंतर सेवानिवृत्त होताना शोभणे यांनी मुख्याध्यापिकापदाचा कार्यभार भावी मुख्याध्यापक विजय सहारे यांच्याकडे सुपूर्द केला. कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या कार्याचा गौरव करत हा सोहळा आनंदी वातावरणात पार पडला.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *