
एसएम -प्रतिनिधी -एन. एस. सय्यद.
एमएमआरडीए, एसआरए प्रकल्पांमुळे बाधितांच्या प्रश्नांवर आंदोलन; अॅड. भास्कर परब यांचा पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार
मुंबई : मालाड पूर्वेतील आप्पापाडा परिसरातील नागरी समस्या आणि एमएमआरडीए तसेच एसआरए प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोशी विभाग अध्यक्ष अॅड. भास्कर भाऊ परब यांनी सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाने प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलनाची सांगता झाली.
वनविभागाची हरकत, रस्ते रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांचे पुनर्वसन आणि पुनर्वसनाच्या ठिकाणी मूलभूत सुविधांची उपलब्धता हे या आंदोलनाचे प्रमुख मुद्दे होते. या मागण्यांसाठी परब यांनी उपोषण सुरू केले होते. स्थानिक नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार, वनविभागाची हरकत निश्चित करण्यासाठी शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले आहे. पात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागेची चाचपणी सुरू आहे. १२० फूट रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न महापालिकेच्या सहआयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच २३.४० मीटर रुंद रस्त्यावरील बाधितांचे पुनर्वसन करताना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीचा प्रश्न कायम आहे. प्रशासनाने दिलेली आश्वासने केवळ कागदावर न राहता त्यांची कालमर्यादेत पूर्तता व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे अॅड. परब यांनी सांगितले.
आंदोलनाला वॉर्ड क्रमांक ३८ मधील नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे प्रशासनाला प्रश्नांची दखल घ्यावी लागली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आता पुनर्वसनाच्या निर्णयांची अंमलबजावणी कधी होते, यावर बाधित नागरिकांचे भवितव्य अवलंबून आहे.
अॅड. भास्कर परब म्हणाले,
“वॉर्ड क्रमांक ३८ मधील जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, त्यामुळे , म्हणून प्रशासनाला जाग आली!तरी ही जनतेच्या न्याय साठी आमचा संघर्ष पुढे ही असाच सुरूच राहणार -भास्कर परब -विभाग अध्यक्ष दिंडोशी.(उपोषण करते )
Congrats