
एस एमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : दिवाळीचा सण केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू घटकांसोबत आनंद वाटून घेण्याच्या उद्देशाने शिव सम्राट फाऊंडेशनच्या वतीने मालाड पश्चिम येथे चर्मकार बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. फटाक्यांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून त्या रकमेतून चर्मकार बांधवांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत मालाड परिसरातील चर्मकार बांधवांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या या बांधवांना जागेची कमतरता, रोजगाराची असुरक्षितता अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी निदर्शनास आले.
मुंबईतील विविध पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये चर्मकार बांधवांसाठी स्वतंत्र छोटे व्यावसायिक गाळे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिव सम्राट फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सम्राट बागुल यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. यामुळे या समाजातील बांधवांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी मिळून त्यांच्या व्यवसायाला स्थैर्य प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.
‘सण केवळ स्वतःच्या कुटुंबासोबत साजरे करण्यापेक्षा समाजातील गरजू बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात खरा सण साजरा होतो. प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याची आणि रोजगाराची संधी मिळाली पाहिजे,’ अशी भावना सम्राट बागुल यांनी व्यक्त केली.
या उपक्रमात नीलम, शकीला, आलम, सुनील, मुकेश यांच्यासह फाऊंडेशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Good job
खुप खुप छान एक खुप छान संदेश समाजाला दिला आहे