एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : मालाड पूर्वेतील खोत डोंगरी, वडार पाडा आणि पासपोर्ट कार्यालय परिसरात अमली पदार्थांची कथित विक्री, मारहाण आणि नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अन्वर मकसूद शेख उर्फ सोनू लंगडा याच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अस्लम मोहम्मद कुरेशी यांनी दिंडोशी पोलिसांकडे आणि पोलीस उपायुक्त यांच्या कडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १५ जानेवारी २०२६ रोजी अन्वर शेख याने त्यांना आणि त्यांचे मित्र लहू रामचंद्र मांजरेकर यांना हातपाय तोडण्याची तसेच भर चौकात जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सोशल मीडियावर स्टेटस ठेवूनही धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करूनही संबंधित व्यक्तीकडून त्रास सुरूच असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
संबंधित व्यक्ती एमडी ड्रग्ज, कोकेन, चरस, गांजा आणि अन्य अमली पदार्थांची विक्री करत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. यापूर्वीच्या हत्या प्रकरणात त्याचे नाव एफआयआरमध्ये असल्याचा तसेच त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. याशिवाय यापूर्वी त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, तक्रारदारांच्या पुतण्यालाही धमकावण्यात येत असल्याचा आरोप आहे. ‘तुझ्या काकाला ठार मारल्यानंतर तुझी बारी’ अशा शब्दांत धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी अशफाक हुसेन सेलोटी यांना मारहाण करून शिवीगाळ व धमकावल्याची तक्रारही दिंडोशी पोलिसांत नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
अमली पदार्थांच्या कथित व्यवहारांमुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून नागरिकांना धमकावले जात असल्यास पोलिसांनी त्याची गंभीर दखल घ्यावी. संबंधित व्यक्तीविरोधात एनडीपीएस कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार कारवाई करावी. आवश्यक असल्यास तडीपारीची कारवाई करून परिसरात शांतता व सुरक्षितता निर्माण करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
अशा लोकाना तडीपारीची कारवाई केलीच पाहिजे हि समाजला लागलेली किड आहे