जयभीम वस्तीमध्ये ‘सृजन वाचनकट्टा’ सुरू..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

इचलकरंजी : २६ नोव्हेंबर २०२६ भारतीय संविधान स्वीकृती दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी येथील जयभीम वस्तीमध्ये न्यू भीमज्योत युवक मंडळाच्या सहकार्याने ‘सृजन वाचनकट्टा’चे उद्घाटन करण्यात आले. वस्तीतील मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना पुस्तकांशी जोडता यावे आणि वाचनासाठी एक हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. सुरुवातीला ‘पंढरीस वाजे घंटा’ या पुस्तकाचे पुनःप्रकाशन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मुलांना गोष्टींची पुस्तके आणि संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रती भेट देण्यात आल्या.

यानंतर मालती माने विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय रेंदाळकर सर यांनी मुलांसोबत गप्पा आणि संवाद साधला. संविधानात ज्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या सामूहिक जीवनासाठी काही नियम आणि मूल्ये आहेत, त्याचप्रमाणे वाचनकट्टा चालवतानाही काही नियम असणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी मुलांसमोर मांडला. विशेष म्हणजे, वाचनकट्ट्याचे नियम मुलांनीच स्वतः तयार केले. एकमेकांना शिवी न देणे, एकमेकांना मारहाण न करणे, वाचनकट्ट्याची जागा स्वच्छ ठेवणे आणि पुस्तकांची पाने न फाडणे असे नियम मुलांनी सुचवले. मुलांनी स्वतः तयार केलेल्या या नियमांमधून सामूहिक जबाबदारी आणि शिस्तीची जाणीव निर्माण करण्याचा एक सुंदर प्रयत्न झाला. संपूर्ण संवाद हसत-खेळत आणि मुलांच्या उत्स्फूर्त सहभागातून पार पडला.

या कार्यक्रमाला वस्तीतील जवळपास २० ते २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे स्वागत आणि सूत्रसंचालन रोहित पालके यांनी केले, तर शेवटी त्यांनी संजय रेंदाळकर यांचे आभार मानले. पुकार संस्थेच्या फेलो कोमल माने यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन कार्यक्रम घडवून आणला. त्यांना रोहित पालके यांचे सहकार्य लाभले. यावेळी निलेश बनगे यांचीही उपस्थिती होती. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या न्यू भीमज्योत युवक मंडळाच्या सर्व सदस्यांचे, वस्तीतील बांधवांचे आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार!


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *